पारोळा पंचायत समिती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील एका गावात विकास कामांसाठी मंजूर निधीची वर्क ऑर्डर काढण्यासाठी ग्राम विस्तार अधिकाऱ्यासह सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याविरुद्ध एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे सरपंच यांचा मुलगा असून त्यांच्या गावातील ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काँक्रेट व पेव्हर ब्लॉक अशा एकूण चार कामांच्या प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे ६० लाखांचे काम शासनाकडून मंजूर होऊन आलेले होते. (केसीएन)या कामाची वर्कऑर्डर काढण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (वय २८) यांनी ग्रामविस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८) यांच्यासाठी २ टक्के प्रमाणे व स्वतःसाठी १ टक्के प्रमाणे १ लाख ८० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
त्याबाबत तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १० सप्टेंबर रोजी तक्रार दिली होती. (केसीएन)तक्रारीची पडताळणी केली असता ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी प्रोत्साहन देऊन कल्पेश बेलदार यांनी पंचांसमक्ष तडजोडीअंती १ लाख रुपये बीडिओसाठी लाचेची मागणी करून १ लाख रुपये लाच स्वीकारताना त्यांना शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्यांच्यावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी सापळा रचला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, स्मिता नवघरे, हेडकॉन्स्टेबल सुनील वानखेडे, किशोर महाजन, बाळू मराठे, हेडकॉन्स्टेबल सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हेडकॉन्स्टेबल शैला धनगर, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, सचिन चाटे यांनी कारवाई केली आहे.