पुणे (वृत्तसंस्था) – श्रीगोंदा, करोना विषाणू संसर्गाने संपूर्ण जग हैराण झाले असताना आ. बबनराव पाचपुते यांनी राज्यातील सरकार निष्क्रिय असून, जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका केली. ही वेळ सर्वांनी एकत्र लढा देण्याची आहे. मात्र लोकप्रतिनिधींना राजकारण सूचत आहे. शिवसैनिकांच्या मतांवर आमदार झालेल्या आ. पाचपुते यांनी ठाकरे सरकारवर बोलू नय,े अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी केली.
भाजपच्या वतीने आ. पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना दोन दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. त्यात राज्य सरकारवर टीका करण्यात आली होती. त्याचा संदर्भ घेत शेलार यांनी पाचपुतेंचा खरपूस समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, अडचणीच्या कालखंडात आ. पाचपुते यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी काय केले, याच आत्मपरीक्षण करावे.
या भयंकर संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार कष्ट घेत आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले आहे, याचा पाचपुतेंना विसर पडला आहे. शेजारील आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या कारखान्याच्यावतीने सॅनिटायझर तयार करून त्याचे जनतेला वाटप केले आहे.आपण मात्र आपल्या साईकृपा कारखान्याच स्पिरिट कुठे आणि कशासाठी पाठविलं, हे जग जाहीर आहे. हेच का तुमच योगदान, असा सवाल करून स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही तुमची कायमचीच सवय आहे, असा हल्ला करून दिशाभूल करण्याचे उद्योग बंद करा व सरकारवर टीका करण्या अगोदर आत्मपरीक्षण करावे, मगच बोलावे, असा सल्ला शेलार यांनी दिला आहे.