धरणगाव बसस्थानकातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : शहरातील बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या वृद्धाचे पैसे लांबवून पलायन करणाऱ्या दोन युवकांना धरणगाव पोलिसांनी पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील वाघळूद बुद्रुक येथील अशोक त्र्यंबक पाटील (वय ७६) हे १६ हजार रुपये घेऊन धरणगाव येथील बैल बाजारात बैल घेण्यासाठी आले होते. परंतु बैल पसंत न पडल्याने ते धरणगाव बस स्थानकातून पिप्री खुर्दकडे जाणाऱ्या बसमध्ये चढले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या खिशातील १० हजार रुपये गायब आहेत. त्यांनी मागे वळून पाहिले असता त्यांना दोन युवक पळताना दिसले.
त्यांनी आरडाओरड केली असता बस स्थानकावर हजर असलेले हवालदार संजय सूर्यवंशी व समाधान भागवत यांनी त्या चोरांचा पाठलाग केला. धरणगाव बस स्थानकामागील अर्बन बँकेजवळ त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अशोक पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित इमरान युसुफ भिस्ती (वय २५, रा. लक्ष्मी नगर कानळदा रोड, जळगाव) तसेच शेख गुलबाज शेख अशपाक (२३, रा. सिंधी कॉलनी जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.