जळगाव (प्रतिनिधी) : धावत्या रेल्वेतून पडल्याने एका परप्रांतीय प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आसोदा भादली रेल्वे स्टेशन दरम्यान घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कमल रेवाराम पटेल (वय ५३ रा. लोणारा ता.जि.खरगोन मध्यप्रदेश) असे मयत परप्रांतीय प्रौढाचे नाव आहे. कमल रेवाराम पटेल हे प्रौढ व्यक्ती मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील लोणारी गावात आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. गुरूवारी दि. १२ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा ९ वाजेच्या सुमारास रेल्वेने प्रवास करत होते. जळगाव तालुक्यातील आसोदा ते भादली रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४२४ च्या १४ आणि १६ जवळ धावत्या रेल्वेतून पडले.
त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ सुधाकर शिंदे आणि जयेंद्रसिंग पाटील यांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधाकर शिंदे हे करीत आहे.