जळगाव शहरातील शास्त्रीनगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शास्त्रीनगर भागात एका चहाच्या टपरीवर चार ते पाच गुंडानी हैदोस घालत, एका बँक कर्मचाऱ्याला लोखंडी रॉड व चापटा-बुक्क्यांनी मारहाण करत, संबधिताला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली आहे. या प्रकरणी चौघांविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात गुंड, टवाळखोरांनी अनेक ठिकाणी उच्छाद मांडला आहे. घटनेतील संबधित ३३ वर्षीय बँक कर्मचारी रात्री १० वाजता एका चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी आलेल्या चार जणांनी काही जणांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही जणांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. बँक कर्मचारी देखील त्या ठिकाणाहून घरी जाण्यास निघाला असतानाच, काहीही कारण नसताना संबधिताशीही त्या चौघांनी वाद घातला. तसेच बॅंक कर्मचाऱ्याने विरोध केल्यानंतर त्याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतरही ते थांबले नाही, चौघांपैकी एकाने लोखंडी रॉडनेही संबधिताला मारहाण केली. यामध्ये बँक कर्मचाऱ्याला जबर दुखापत झाली. मंगळवारीच मध्यरात्री बँक कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आदेश सपकाळे, भावेश सपकाळे, भोजराज पवार (रा.शिवाजीनगर) व तेजस हटकर (रा.समतानगर) या चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रविण जगदाळे हे करत आहेत.