शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उद्यापासून आरोग्य तपासणी
जळगाव (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज दि. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान आरोग्य तपासणी शिबिर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी सकाळी १० ते १.३० या वेळेमध्ये घेण्यात येत आहे. गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
वय वर्ष ६५ च्या वरील ज्येष्ठ नागरिकांना सुविधेचा लाभ घेता यावा यासाठी राज्य शासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार मंगळवार दि. १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली. योजनेसाठी आरोग्य तपासणी महत्वाची असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही ही समाज कल्याण विभागाअंतर्गत होणार आहे.
त्या अनुषंगाने शुक्रवार दि. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान सकाळी १० ते १.३० या वेळेमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, दोन फोटो, स्वयंघोषणापत्र, उत्पन्न व दुबार लाभाबाबतची कागदपत्रे व संबंधित कागदपत्रे घेऊन शासकीय रुग्णालयांमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी केले आहे.