अमळनेर रेल्वे परिसरातील घटना ; दोघे अटकेत
अमळनेर (प्रतिनिधी) : रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याने हटकल्याचा राग आल्याने तिघांनी दोन रेल्वे कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. यात एक जखमी झाला. यात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आरपीएफ पोलिस अधिकारी कुलभूषणसिंह चौहान यांनी दिली आहे.
रेल्वे स्थानकाजवळ दि. ५ रोजी रिक्षा चालकाला रेल्वे अभियंत्याचा वाहनाचा धक्का लागल्याचा आरोप करत रिक्षाचालक कार्यालयात गेला. त्यावेळी अभियंत्याने सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याला बोलावले. हरेंद्र कुमार हा कर्मचारी पोहोचला. त्याने रिक्षा चालकाचा समजावले. त्याचा राग आल्याने तीन जणांनी जीआरपी कार्यालयासमोरच दि. ६ रोजी दुपारी ३:३० वाजता हरेंद्र कुमारवर चाकुने हल्ला केला. त्यात हरेंद्र कुमार जखमी झाला. तसेच अर्जुन सिंग या अन्य आरपीएफ कर्मचाऱ्यावरही हल्ला केला. मात्र गणवेशातील बेल्टमुळे अर्जुनसिंग बचावले. यातील दोन हल्लेखोर संशयितांना रेल्वे पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. जखमी हरेंद्र यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.