नाथाभाऊंचे राजकारण नेमके आहे तरी काय ?
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जिल्ह्यातील जेष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथराव खडसे हे सध्या राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरलेले आहेत. एकीकडे भाजप त्यांचा प्रवेश जाहीर करीत नाही, दुसरीकडे शरद पवार सोडायला तयार नाही अशी स्थिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर सोयीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. लोकसभेत एकनाथरावांची सून रक्षाताई ह्या खासदार झाल्या, मंत्रीदेखील झाल्या. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कन्या रोहिणीताई आमदार होणार काय ? एकनाथरावांचे राजकारण नेमके आहे तरी काय ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.
एकनाथराव खडसे यांनी शनिवारी, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली पाहिजे असे साकडे त्यांनी श्री गणेशाला घातले आहे. याबाबत त्यांनी माहिती दिली. महाविकास आघाडीची सत्ता आली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणीताईं आमदार झाल्या तर त्यांनाही मंत्रीपद मिळेल काय ? असा तर्क राजकीय वर्तुळात लावला जातोय. (केएसएन) लोकसभा निवडणूक हि आ. एकनाथराव खडसेंना यावेळी वेगळीच राहिली. भाजपत असलेल्या सुनबाईंच्या विरोधात नाथाभाऊ स्वतः किंवा मुलीला उभे करू शकले नाही. या काळात ते भाजपशी सलगी होत असल्याबाबत सांगत होते.
दिल्लीत भाजपच्या नेत्यांशी गाठीभेटीदेखील घेत होते. मात्र या भेटींविषयी काहीही सांगत नव्हते. दरम्यान, लोकसभेत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असतानाही उघडपणे भाजपच्या रक्षा खडसेंसाठी काम केले. रक्षा खडसे निवडून आल्या. राज्यमंत्रीही झाल्या. आता नाथाभाऊंनी माध्यमांना त्यांच्या वाढदिवशी ‘ती’ गोष्ट सांगितली. भाजपमध्ये माझा प्रवेश झाला आहे. मात्र “खाली” विरोध झाल्याने तो जाहीर झालेला नाही, असे सांगून त्यांनी आणखी काही दिवस भाजपच्या ‘जाहिर’ ची वाट पाहिल असे सांगितले. मात्र वरिष्ठांनी सांगितल्यावर ‘खाली’ विरोध होईल काय ? हे शक्य आहे काय ? या प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
भाजप प्रवेश ‘जाहीर’ न झाल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहिलं असेही नाथाभाऊ म्हटले. मुक्ताईनगरची जागा हि महायुतीत शिंदेसेनेच्या वतीने विद्यमान आ. चंद्रकांत पाटील यांनाच मिळण्याचे संकेत जास्त आहे. त्यात नाथाभाऊ भाजपात राहिले तर रोहिणीताई यांना तिकीट मिळणे कठीण होऊन विरोधक असलेले चंद्रकांत पाटील यांचा प्रचार खडसेंना करावा लागणार आहे. चंद्रकांत पाटलांचा प्रचार नाथाभाऊ करू शकत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात नाथाभाऊ हे “कम बॅक” करीत असल्याचे सांगत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषेत नाथाभाऊंचे सोयीचे राजकारण ते हेच आहे काय अशी चर्चा आहे. तर नाथाभाऊंचा भाजप प्रवेश रोखण्यात उपमुख्यमंत्री फडणवीस, मंत्री गिरीश महाजन हे यशस्वी झालेत अशी प्रतिक्रिया राजकीय कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.