जामनेर तालुक्याचा झाला राज्य शासनामार्फत सन्मान
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढालगावचे मुख्याध्यापक संदीप जगन्नाथ पाटील यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनामार्फत यावर्षीचा सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील अनेक क्षेत्रांतून संदीप पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
उपशिक्षक संदीप पाटील यांचे मूळ गाव गोद्री, ता. जामनेर आहे. ते नोव्हेंबर २०१३ पासून ढालगाव शाळेत जिल्हा बदलीने पदस्थापित झाले आहेत. ८३ पटसंख्या असलेल्या या शाळेने आज १६८ पटसंख्या गाठली आहे. त्यांनी १ ते ४ च्या शाळेचा विस्तार १ ते ८ च्या शाळेत करून शाळेचे रूपच पालटून टाकले आहे. त्यांच्या कार्यामुळे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढली आहे आणि शाळा अतिशय सुंदर बनली आहे. शाळेत सर्व शाळांना डिजिटल करणारा बाला हा महत्त्वाकांक्षी उपक्रम संदीप पाटील यांनी राबविला. त्यांनी शाळेतील ४८ विद्यार्थिनींसाठी पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेत स्वखर्चाने पहिला हप्ता भरून खाते काढण्याचा नवोपक्रम केला आहे.
जामनेर तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील पहिली ते बारावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी मा. जे. के. चव्हाण, माजी अभियंता जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कॅम्प आयोजित करून सुमारे २१० विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून दिले. आज त्या विद्यार्थ्यांना दरमहा १५०० रुपयांचा दिव्यांग भत्ता मिळत आहे. पाटील यांनी जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता चौथीसाठी जे.टी.एस. (जामनेर टॅलेंट सर्च) व इयत्ता पाचवी ते आठवीसाठी ‘मिशन शिष्यवृत्ती’ हा उपक्रम राबविला. मंत्री गिरीश महाजन व माजी अभियंता जे. के. चव्हाण यांच्या आर्थिक साहाय्याने तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी चार चाचण्यांचे आयोजन करण्यात येते. गेल्या वर्षी ४८विद्यार्थी तर यावर्षी ५९ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये पात्र ठरले आहेत.
यावर्षी राज्य शासनाकडून ढालगाव शाळेला ५० लाख रुपये किंमतीची फ्युचरिस्टिक लॅब मंजूर झाली आहे, जी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव प्रयोगशाळा ठरणार आहे.ढालगाव येथील डोंगराळ भागातील एक छोटीशी शाळा आज एक ते आठची शाळा बनली असून आठ शिक्षक शाळेला मान्य झाले आहेत. या सर्व यशाचे श्रेय संदीप पाटील यांच्या अथक परिश्रमांना जाते. या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनामार्फत यावर्षीचा सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन संदीप पाटील यांचा सन्मान करण्यात आला आहे.