जामनेर, बोदवड तालुक्यातील घटना
जामनेर,बोदवड (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील शहापूर येथील इसम हा खडकी नदीच्या पुरामध्ये वाहून गेल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. तर दुसरीकडे बोदवड तालुक्यातील हरणखेड तलावातदेखील एक तरुण वाहून गेला आहे. दरम्यान जामनेर तालुक्यातील तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. तर बोदवड तालुक्यातील तरुणाचा मृतदेह झाडीत आढळून आला.
जामनेर तालुक्यातील शहापूर येथील रहिवासी मोहन पंडित सूर्यवंशी (वय ४०) हे खडकी नदीच्या जवळ गेले असताना तेथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांसह पोलीस पाटलांना माहिती दिली त्यानंतर आपत्कालीन बचाव पथकाला कळविण्यात आले. त्यांनी शोधकार्य सुरू केले. यावेळेला तहसीलदार नानासाहेब आगळे व जामनेरचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
खडकी नदीच्या पुरात मोहन सूर्यवंशी याचा शोध घेण्याचा आपत्कालीन बचाव पथकासह ग्रामस्थांनी प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत ते मिळून आले नाहीत. त्यामुळे सकाळी युद्धपातळीवर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
दुसऱ्या घटनेत, बोदवड तालुक्यालगतच्या विदर्भातील हरणखेड गावातील नदीत बैल धुताना सोमवारी सकाळी शेतकरी बैलासह वाहून गेला. पोळ्याच्या दिवशीच्या घटलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. बोदवड तालुक्यातील हरणखेड गावच्या नदीच्या पलीकडच्या काठावर मलकापूर तालुक्यातसुध्दा हरणखेड गाव आहे. तेथे सकाळी शेतकरी गोपाल प्रभाकर वांगेकर (वय २८) हा बैल धुण्यासाठी नदीत उतरला असता पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. यामुळे हा तरुण बैलासह वाहून गेला.
मृतदेह नदीतील झुडपांमध्ये एनडीआरएफच्या पथकाने बोटीच्या साहाय्याने शोधून काढला. दरम्यान, बैल मात्र सापडला नाही. या दुर्घटनेने दोन्ही हरणखेड गावात पोळा सण साजरा झाला नाही. शेतकरी गोपाळ वांगेकर याच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार असून दोन एकर शेती आहे.