चोपडा तालुक्यातील दुर्दैवी घटना
चोपडा (प्रतिनिधी) : विरवाडे येथील रहिवाशी इंजिनीयर असलेल्या तरुण शेतकऱ्याचा गुळ धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दिनांक ३१ रोजी दुपारी ११:३० वाजता घडली. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
नितीन प्रविणसिंग पाटील (वय ४५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नितीन पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. नितीन पाटील यांनी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग केलेली असून ते शेतीदेखील करत आहेत. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते गुळ धरणावर फिरण्यासाठी गेलेले असता त्यांचा अचानक पाय घसरुन ते धरणात बुडाले. सदर घटनेची माहिती विरवाडे गावात समजताच कुटुंबियांसह नातेवाईक आणि ग्रामस्थांनी गुळ धरण गाठले.
त्यानंतर ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी देखील पीएसआय बापू साळुंखे, पोकॉ. किशोर माळी आदींना घटनास्थळी पाठविले. अथक परिश्रमानंतर संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास नितीन पाटील यांचे शव ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरा पर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.