चोपडा तालुक्यातील बढाई पाडा येथील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील बढाई पाडा येथे वीजप्रवाह उतरलेल्या कूलरचां धक्का लागल्याने 16 वर्ष तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी ८:३० वाजता घडली. या प्रकरणी अडावद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सायजा सुक्राम पावरा (वय १६) असे मृत तरुणीचे नाव आहे. परिवारासह ती बढाई पाडा येथे राहत होती. तिचा परिवार मजुरी काम करून उदरनिर्वाह करत आहे. शुक्रवारी सायजा पावरा ही घराच्या बाजूलाच असलेल्या लहान झोपडीत साफसफाई करत होती. तेथे असलेल्या कुलरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. तिने कुलरला हात लावताच तिला विजेचा शॉक लागल्याने तीचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी तिला तातडीने बिडगावला आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तिचा मृत्यू झाला होता.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. गावचे पोलिस पाटील मुसा तडवी यांच्या खबरी वरून अडावद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान अल्पवयीन तरुणीच्या मृत्यूमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.