पोलीस अधीक्षकांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : भरदुपारी बिअर बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना उघड झाली होती. त्यानंतर कार काढताना काही अंतरावर जाऊन एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाले. ही घटना रविवारी दिनांक २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी चौकशीअंती मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.
जळगावात रविवारी ‘लखपती दीदी’ मेळाव्यासाठी बंदोबस्ताला जिल्हाभरातून पोलीस दल दाखल झाले होते. यात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नेमणूक असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनगर हे रविवारी दुपारी भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये आले. ते गणवेशातच होते व वर जॅकेट घातले होते. यावेळी संदीप धनगर यांना मद्यपान जास्त झाल्याने त्यांना आवरण्यासाठी आणखी दोघे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचेच २ पोलीस कर्मचारी आले.
त्यांनी संदीप धनगर यांना सावरण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहावाजेदरम्यान हि घटना घडली. नंतर कारमध्ये (क्र. एमएच ०२, ईएच १०४८) बसून संदीप धनगर यांनी कशीबशी कार काढली व रस्त्याला लागल्यानंतर समोर एका सायकलस्वार मुलाला धडक दिली. तरीदेखील न थांबता कारचालक भरधाव वेगाने पसार झाला. यात सुदैवाने मुलाला काही दुखापत झाली नाही. हा सर्व प्रकार बारसह आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
दरम्यान, या घटनेत चौकशी झाल्यानंतर संपूर्ण घटना निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दखल घेऊन मुक्ताईनगरचे कॉन्स्टेबल संदीप धनगर यांना गणवेशात मद्यपान करून सार्वजनिक जागी गैरवर्तन केल्याबाबत निलंबित केले आहे. तसेच, त्यांना मुख्यालयी जमा करण्याचे आदेश सोमवारी दि. २६ रोजी संध्याकाळी देऊन पुढील चौकशी करण्याचे संबंधित विभागाला निर्देशित केले आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे यापूर्वीहि पीएसआयसह ५ जण गुटख्याचे वाहनावर कारवाई न करता सोडून दिले म्हणून निलंबित केले आहेत.