धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
धुळे (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह कार्यालयाच्या वेतन अधीक्षिका मीनाक्षी भाऊराव गिरी यांना २ लाख रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी झाली. याप्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार व त्यांची पत्नी हे मनपा शाळेत विशेष शिक्षक या पदावर कार्यरत आहे. शासन निर्णयान्वये त्यांचे एप्रिल २०२२ ते ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत थकीत वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचा तिसरा व चौथा हप्ता मंजूर होवून शिक्षण संचालक पुणे यांनी सदरचे थकीत वेतन अधीक्षक (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाहा निधी कार्यालय, धुळे यांच्या खात्यात जमा केले होते. परंतु सदरचे थकीत वेतन तक्रारदार व त्यांच्या पत्नीस अदा न केल्याने त्यांनी वेळोवेळी कार्यालयाच्या अधिक्षका मिनाक्षी गिरी यांची भेट घेतली होती.
परंतु त्यांनी त्यांच्या पत्नीस कोणत्या ना कोणत्या कारणाने थकीत वेतन अदा केले नाही. त्यानंतर सुमारे पंधरा ते वीस दिवसांपूर्वी तक्रादार यांनी मिनाक्षी गिरी यांची कार्यालयात जावून भेट घेत विनंती केली असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे सुमारे २ लाखाची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचून तक्रारदार यांचेकडून दोन लाख रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवार्ड केली आहे.