भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील निंभोरा येथील रवींद्र ब्रम्हदेव पाटील या शेतकऱ्याच्या ३ गायी व १ बैल अशी ४ जनावरे निंभोरा गावालगतच्या गिरणा नदीच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडली. गाडीला जुंपलेल्या दुसऱ्या बैलाला बांधलेले दोर कापून एका बैलाला वाचवण्यात यश आले.
बैलगाडी चालक विकास पाटील (१९) या तरुणालाही मदतीसाठी धावून आलेल्या शेतकऱ्यांनी वाचवले. ते दोघेही बालंबाल बचावले. निंभोरा व पांढरद हद्दीत गिरणा नदीवर सध्या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या बाजूलाच रवींद पाटील या शेतकऱ्याचे शेत आहे. या पुलापासून ३५० ते ४०० फूट अंतरावर नदीपात्रात खोल खड्डे पडले आहेत.
या ठिकाणी जनावरांना पाणी पाजण्यास नेले असता या ठिकाणी ही घटना घडली. या खड्यांमध्ये गुढघ्याइतके पाणी साचलेले आहे. मात्र, बैलांनी पुढे धाव घेतल्याने बैलगाडीसह जनावरे खोल खड्ड्यात बुडाल्याच्या स्थितीत होते. पाण्याचा अंदाज आला नाही. येथेच वाळूही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, जनावरे सुसाट पळत सुटली. त्यांना खोलगट पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या चारही जनावरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेले असता ही घटना गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली.
पाण्यात बैलगाडी बुडाल्याने बैलगाडीचालक यालाही शेतकऱ्यांनी या पाण्यातून बाहेर काढत वाचविले. मदतीसाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये दीपक पाटील, पिंटू पाटील, संजय भिल, संतोष भावराव पाटील, वाल्मीक नारायण पाटील आदी शेतकऱ्यांचा समावेश होता. कोळगाव महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी भरत पाटील, पांढरदचे तलाठी रामसिंग जारवाल यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला.
२ लाख ८० हजार रुपयांचा नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी निंभोरा पोलिस पाटील शरद पाटील, शेतकरी राजेंद्र पाटील उपस्थित होते.