धुळे शहरातील घटना
धुळे (प्रतिनिधी) : शहराजवळच्या मुंबई आग्रा महामार्गावर पुण्यावरून इंदूरला जाणाऱ्या तरुणीने ट्रॅव्हल्समधून मध्येच धुळे येथे उतरून एका छोट्याशा हॉटेल जवळ अंगावर ज्वलनशील इंधन टाकून स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेमध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे. घटनेचा पोलीस तपास करीत आहेत.
धुळे शहराजवळील नगाव शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावर चहाच्या हॉटेलजवळ एक तरुणी जळालेल्या अवस्थेत आक्रोश करत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. त्या तरुणीला वाचविण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली व तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. रूग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी देखील तिला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जळीत तरुणी कोण आहे, हे ओळखण्यासाठी तपासणी केली असता तिच्याजवळील बॅगमध्ये सापडलेल्या मोबाईल आणि आधार कार्डावरून तिची ओळख पटली. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना या दु:खद घटनेची माहिती दिली आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. रक्षिता पाटीदार असे नाव त्या तरूणीचे असून, ती इंदूर येथील रहिवासी होती. रक्षिता पुण्यातील एका कंपनीत नोकरीला होती आणि रक्षाबंधन तसेच २० ऑगस्टला तिचा वाढदिवस असल्याने ती घरी इंदूरला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सने निघाली होती. मात्र, इंदूरला पोहोचण्याऐवजी सकाळी ६.३० वाजता ती धुळ्यात उतरली.
तिने महामार्गावरील एका पेट्रोल पंपावरून बाटलीत डिझेल खरेदी केले, आणि त्यानंतर पेट्रोल पंपापासून ५०० मीटर अंतरावर तिने स्वतःला पेटवून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिच्या जवळील बॅगमधून सापडलेल्या मोबाईल आणि आधार कार्डावरून तिची ओळख पटवण्यात आली. मृत रक्षिता पुणे येथील एका खासगी कंपनीत कामाला होती आणि तिच्याजवळ त्या कंपनीचे ओळखपत्र सुद्धा आढळून आले.
दरम्यान, रक्षिताचा येत्या मंगळवारी २० ऑगस्टला वाढदिवस होता. त्यामुळे तिला आई-वडिलांनी घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते. दुर्दैवाने वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच रक्षिताला अग्निडाग देण्याची वेळ तिच्या माता-पित्यावर व नातेवाईकांवर आली आहे. घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.