भडगाव तालुक्यात पाचोरा रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील पाचोरा रस्त्यावरील महावितरणच्या कार्यालयासमोर भडगावकडून पाचोराकडे जात असलेल्या दुचाकीस्वारांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील मोतीराम वसावे (वय २५, रा. चानपुरा ता. अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार) आणि योगेश शेवता वळवी (वय २४ वर्ष रा. कोलवान ता. जिल्हा नर्मदा, गुजरात) असे मयत तरुणांचे नाव आहे. पाचोरा येथील सिमेंट प्रॉडक्ट कंपनीमध्ये ते कामगार म्हणून कामाला होते. शनिवारी दि. १० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भडगाव येथून पाचोरा येथे जात असताना त्यांच्या दुचाकीला (जी जे २६ ए एफ ८९२४) हिला अज्ञात भरधाव वाहनाने जोरात धडक दिली. या घटनेत दोघेही तरुण मजूर हे जागीच ठार झाले.
ग्रामस्थांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार भडगाव पोलीस स्टेशनने त्यांचा मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. दरम्यान या प्रकरणी सिमेंट प्रॉडक्ट कंपनीचे मालक भगवान धरमसिंग राजपूत (वय २८,रा. बांबरुड प्रचा ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहेत.