वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांची घोषणा
जळगाव – गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक हे साडेसात हजार सभासदांचे एक कुटुंबच आहे. कुटुंबातील सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर गोदावरी बँक रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत असल्याने यंदा सभासदांना 10 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी आज येथे केली.
गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सरदार वल्लभभाई सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालक सुभाष पाटील, शालीग्राम चौधरी, चंद्रकुमार चौधरी, सुरेश झोपे, डॉ. संपत वानखेडे, हरीष फालक, लिलाधर चौधरी, राजेंद्र कुरकुरे, राजेंद्र महाजन, आशा तळेले, संगिता चौधरी, तज्ञ संचालक सीए सुनील महाले, यमुनाबाई महाजन, व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला आर्थिक वर्षात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी व्यवस्थापकीय संचालक यांनी बँकेच्या आर्थिक वार्षिक अहवालाचे वाचन केले. तसेचे सभेत 12 विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.
जिल्ह्यात एकमेव गोदावरी बँक सुदृढ
सभेत मार्गदर्शन करतांना चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक ही एकमेव बँक आहे जी, सहकार क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुदृढ आहे. आर्थिक शिस्तीच्या बळावरच गोदावरी बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. तसेच बँकेचे भागभांडवल हे 25.66 टक्के असून बँकेला यंदा निव्वळ 1 कोटी 33 लाखांचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले. बँकेची गुंतवणूक ही 52 कोटीची असून कर्जवाटप हे 68 कोटींचे आहे. यंदा बँकेने ठेवींमध्ये 101 कोटींचा टप्पा पार केला असल्याची बाब ही अभिमानास्पद असल्याचे डॉ. उल्हास पाटील म्हणाले. तसेच यंदाही लेखापरिक्षणात बँकेला ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे. आजपर्यंत बँकेवर कुठलीही दंडात्मक कारवाई झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात गोदावरी लक्ष्मी बँक ही नंबर वन असल्याचे ते म्हणाले. गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेची कोअर प्रणाली ही अद्ययावत असल्याने संपूर्ण डाटा हा सुरक्षित आहे. बँकेच्या आत्तापर्यंत स्वमालकिच्या चार इमारती झाल्या आहेत. सभासदांचा विश्वास आणि आर्थिक शिस्त या बळावर गोदावरी बँकेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असल्याने सभासदांना 10 टक्के लाभांश दिला जाणार असल्याचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी जाहीर केले.
27 गुणवंत पाल्यांचा सत्कार
गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेच्या वार्षिक सभेत आर्थिक वर्षात विविध शालांत परिक्षेत यश प्राप्त करणार्या 27 सभासद पाल्यांचा सत्कार संचालक मंडळातर्फे करण्यात आला. तसेच जिल्हा सहकारी बोर्डाचे डी.आर. पाटील यांनी बँक व्यवहारासंबंधीचे प्रशिक्षणाची माहिती देखिल सभेला उपस्थित सभासदांना दिली. सभेला श्रीमती गोदावरी पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, नितीन पाटील, प्रा. शैलेश राणे, ए.के. नारखेडे, प्रमोद भिरूड, डॉ. प्रशांत वारके, एन.जी. चौधरी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.