विधानसभेसाठी मतदारसंघात जोरदार चर्चा
जळगाव (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांच्या जिल्हा वाऱ्या सुरु झाल्या आहेत. काही ठिकाणी गोपनीय तर काही ठिकाणी पक्षांतर्गत खुल्या चर्चा सुरु झाल्या आहेत. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचे प्राबल्य पाहता व नवीन उमेदवार म्हणून डॉ. केतकी पाटील यांना तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे. डॉ. केतकी पाटील यांनी गेल्या ६ महिन्यांपासून मतदारसंघात गाठीभेटी सुरूच ठेवल्या असून जनतेत त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे.
रावेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार बदल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सर्वस्तरातून अभ्यास आणि पाहणी केल्यानंतर पक्षश्रेष्ठी निर्णय घेत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते उमेदवाराबाबत चाचपणी करीत आहेत. संभाव्य उमेदवारांबाबत माहिती घेत आहेत. या मतदारसंघात भाजपकडून विधानसभा प्रभारी अमोल जावळे, डॉ. केतकी पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून विधानसभा मतदारसंघातील २०० पेक्षा अधिक गावांमध्ये डॉ. केतकी यांनी संपर्क वाढविला आहे. तसेच, पक्षातर्फे यंदा उमेदवार बदलण्याबाबत जोरदार हालचाली सुरु आहे. मागील काही महिनांपुर्वी डॉ. केतकी यांच्यासह त्यांचे वडील काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
एकंदरीत सर्व चित्र पाहता भाजपकडून डॉ. केतकी पाटील यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षतर्फे यंदा युवा नेते धनंजय शिरीष चौधरी अशी सक्षम लढत होण्याची शक्यता आहे. रावेर, यावल येथे भाजप मजबूत आहे. मित्रपक्षाची मदत त्यांना होऊ शकते. याविषयी मतदारसंघात जोरदार प्रचार व चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे याना मिळालेले यश पाहता त्याचा फायदा डॉ. केतकी पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे.