जामनेर शहरातील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : शहरातील आनंदनगरमधील तीन दिवसांपासून बंद असलेल्या घरात झालेल्या चोरीत दोन लाख २१ हजारांची रोकड व ३ हजाराचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
देवीदास बारसू मोरे (आनंदनगर, जामनेर) हे कुटुंबीयांसह नाशिक येथे गेले होते. गुरुवारी सकाळी ते घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. चोरट्यांनी घराच्या समोरच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घराच्या कपाटातील सामान रोकड, चांदीचे शिक्के व कानातील सोन्याचे दागिने लांबवले. या घरातील एकूण २ लाख २४ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. इतरही खोल्यातील सामान अस्ताव्यस्त फेकले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तपासासाठी अंगुलीतज्ज्ञ व श्वान पथकाची मदत घेण्यात आली. हवालदार विलास महाजन तपास करीत आहेत.