पारोळ्यात नोंदीसाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत
पारोळा (प्रतिनिधी) : पीकविमा असो अथवा नुकसान भरपाई, यासाठी ‘ई ची पीक पाहणी’ बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना मिळणारा विविध योजनांचा लाभासाठी पीक लावणे गरजेचे असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी, तसेच शेतकऱ्यांनी वेळेवर आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी करावी, यासाठी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी स्वतः शेतशिवारात जात बांधावर पीक पाहणीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. या वेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी म्हसवे शिवारातील शेतात जाऊन पिकांची पाहणी केली.
या वेळी कार्यक्षेत्रातील सर्व पिकांची ‘ई-पीक पाहणी’ १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले. शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येते, परंतु ज्या शेतकऱ्यांची ‘ई पीक पाहणी’ पूर्ण केली आहे. अशाच शेतकऱ्यांना पात्र ठेवण्यात येणार आहे. विमा कंपनीकडून ई पीक पाहणीच्या अहवालातूनच शेतकऱ्यांना पात्र-अपात्र ठरविण्यात येत असते. त्यामुळे शेतकरी पीकविमा मदतीसाठी पात्र असताना देखील ई-पीक पाहणी झालेली नसल्याने अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून अपात्र ठरविण्यात येत असते. त्यामुळे ई पीक पाहणी करणे सर्वांना बंधनकारक आहे. याप्रसंगी प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, म्हसवे तलाठी बाविस्कर, तलाठी निशिकांत पाटील, प्रशांत निकम, ज्ञानेश्वर पन्हाळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी तालुक्यातील म्हसवे शिवारात प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी भेट देत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.