गुलाबराव देवकरांच्या सोईस्कर भुमिकेमुळे ठाकरे गट प्रचंड नाराज !
जळगाव (प्रतिनिधी) ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते गुलाबराव देवकर यांची भेट घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या भेटीमुळे ठाकरे गट दुखावला गेला आहे. यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
उन्मेष पाटील यांचे राजकीय करिअर समाप्त करू पाहणाऱ्या आ.चव्हाण यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जवळीक साधत असतील, तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, अशी भुमिका ठाकरे गटातर्फे मांडण्यात येत असल्याचे कळतेय. आठवडाभरापूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ना.पाटील यांनी जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आ.चव्हाण यांना जशास तसे उत्तर दिले होते.
यानंतर आ.चव्हाण यांनी पालकमंत्र्यांचे राजकीय विरोधक व शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांची भेट घेतली. या भेटीमुळे ठाकरे गटात अस्वस्थतता पसरली आहे. कारण मंगेश चव्हाण व उन्मेष पाटील यांच्यातील वाद अवघ्या जिल्ह्याला परिचित आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या वादाने कळस गाठला आहे. भाजपाचा जो नेता आमच्या ठाकरे गटाच्या नेत्यावर टोकाची टीका करतो, प्रमुख राजकीय विरोधक असतो त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जवळीक साधतात, हे न पटणारे आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही हे लक्षात ठेवू, असा सूर जळगाव ग्रामीणसह जिल्ह्यातील ठाकरे गटामध्ये उमटत आहे.
जळगाव ग्रामीणमधील ठाकरे गटाच्या नाराजीचा फटका गुलाबराव देवकरांना बसू शकतो. कारण देवकरांच्या या सोईस्कर भुमिकेमुळे ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते कमालीचे दुखावले गेले आहेत. उन्मेष पाटील हे उत्तर महाराष्ट्राचे नेते आहेत. आणि त्यांच्या राजकीय विरोधकाला देवकर जवळ करत आहेत. याला आम्ही काय समजावे ? असे ठाकरे गटाच्या कार्याकर्त्यांचे म्हणणे आहे. या विषयाची तक्रार थेट उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत होणार असल्याची महिती समोर येत आहे. दरम्यान, आमदार चव्हाण आणि देवकर यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत असून याचा फटका देवकर यांना विधानसभेत बसण्याची देखील शक्यता वर्तवली आहे.