धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
धुळे (प्रतिनिधी) : येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याकडून प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी व आधी अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने जिल्हा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने २ हजार रुपये लाचेची मागणी केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या वरिष्ठ लिपिकाला २ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सुनील वसंत गावित (वय ४८ वर्ष) असे लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. ६२ वर्षीय तक्रारदार हे धुळे पोलीस दलातून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून सन २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले आहे. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांची राहिलेली बिले मंजूर होऊन मिळणे करिता दि. १० जुलै रोजी पोलीस अधीक्षक, धुळे कार्यालय येथे अर्ज केले होते. (केसीएन)त्यापैकी त्यांना १ कोटी २९ लाख ८८८ रुपयांचे बिल त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे उर्वरित बिलाबाबत वरिष्ठ लिपीक सुनील वसंत गावित यांची कार्यालयात भेट घेऊन चौकशी केली.
त्यावेळी सुनील गावित यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात व बाकी राहिलेली बिलांचे काम करून देण्याकरीता कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने २ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत सेवानिवृत्त तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिंबधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.(केसीएन)सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज दि. २ ऑगस्ट रोजी पंचांसमक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे जाऊन पडताळणी केली असता, सुनील गावित यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने २ हजार रुपये लाचेची मागणी केली.
सदर लाचेची रक्कम पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध धुळे शहर पोस्ट येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रविण पाटील, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.