चाळीसगावात उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण
चाळीसगाव (प्रतिनिधी) : नागरिकांची शासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावीत, त्यांच्या वेळ आणि श्रमाची बचत व्हावी यासाठी आ. मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून सर्व विभाग एकाच ठिकाणी असणारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साकारली गेली आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा रविवारी दिनांक २८ रोजी सायंकाळी ५ वाजता होत आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहतील.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने दीड वर्षांपूर्वी २५ कोटी रुपयांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार, शहरातील शासकीय दूध डेअरी जवळील १५ हजार चौरस मीटर जागा यासाठी आरक्षित करण्यात आली. दोन मजल्यांच्या या इमारतीत तळ मजल्यावर १ हजार ८२७ चौरस मीटर व पहिल्या मजल्यावर १ हजार ८०१ चौरस मीटर बांधकाम करण्यात आले. या बांधकामासाठी २४ महिन्यांची मुदत असताना आमदार चव्हाण यांच्या पुढाकाराने केवळ १६ महिन्यात हे बांधकाम पूर्ण करण्यात आले. या इमारतीचे लोकार्पण ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
या इमारतीमुळे चाळीसगाववासीयांचे जणू स्वप्न साकार झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील ही एकमेव अशी मॉडेल मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ठरली असून या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले आहे. या ठिकाणी तहसील कार्यालयातील सर्व विभाग तसेच तालुका भूमी अभिलेख कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, उपकोषागार कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय १ व २, स्ट्रॉग रूम, ट्रेझरी रूम, मुद्रांक कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालय आदी विविध शासकीय कार्यालयांसाठी सुसज्ज व देखणी अशी १५ दालने राहणार आहेत.