जळगाव तालुक्यात नशिराबाद येथे घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळकडून जळगावला येत असताना नशिराबादजवळ नीलगायला वाचविण्याच्या प्रयत्नात एक कारचा अपघात रविवारी दि. २१ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता झाला होता. या अपघातात एअरबॅग उघडल्याने कारमधील तिन्ही युवकाचा जीव वाचला होता. मात्र, अपघातात पोटाला दुखापत झाल्याने, त्याकडे दुर्लक्ष झाले. दुसऱ्या दिवशी पोटात रक्तस्त्राव झाल्यामुळे रुग्णालयात युवकाचा उपचारादरम्यान बुधवारी दि. २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता नाशिक येथे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.
अविनाश कैलास पाटील (वय ३०, रा.सतखेडा,ता.धरणगाव ह.मु. गुजराल पेट्रोलपंप परिसर जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. अविनाशच्या पश्चात पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा रिहान, विवाहित बहिण, आई, वडिल असा परिवार आहे. अविनाशने काही महिन्यांपुर्वी स्वत:चा व्यवसाय सुरु केला होता. त्याचे वडील कैलास पाटील हे एसटी महामंडळात नोकरीला आहेत.(केसीएन) अविनाश आपल्या मित्रांसोबत रविवारी दि. २१ जुलै रोजी सायंकाळी भुसावळकडे गेला होता. रात्री ११ वाजता जळगावकडे परत येत असताना, नशिराबाद जवळील गैबनशाह पीर बाबा दर्ग्याजवळ रस्त्यालगत अचानक नीलगाय आल्यामुळे नीलगायला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याने मोठा अपघात घडला. मात्र, एअरबॅग उघडल्याने कारमधील तीघांचा जीव वाचला होता.
या अपघातादरम्यान अविनाशच्या पोटाला अंतर्गत दुखापत झाली होती. अविनाशने किरकोळ उपचार घेत त्या जखमेकडे दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्या दिवशी पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे अविनाशची तब्येत बिघडली. त्याला जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्याठिकाणाहून त्याला पुन्हा नाशिकला हलविण्यात आले. बुधवारी २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.