मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मुक्ताईनगर शहरात एका कार चालकावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून २२ लाख ३८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याला दिनांक २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुक्ताईनगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गोपनीय माहिती मिळाली होती.(केसीएन) त्यानुसार काळा रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ एम एच २७ डी एल २४९६ यातून अवैधरित्या सुगंधी तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक होत असल्याबद्दल त्यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कारवाई करण्याबाबत आदेशित केले.
त्यानंतर मुक्ताईनगर शहरात वाहनांची तपासणी करत असताना स्मशानभूमी परिसरात सदर स्कॉर्पिओ कार दिसून आली. यातील चालकाची आणि वाहनाची तपासणी केली असता त्यात २२ लाख ३८ हजार ५० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला आहे. त्यानुसार संशयित आरोपी अजीज शेख बाबू (वय ३६, रा. झांसी नगर, रिसोड ता. रिसोड जि. वाशिम) याला अटक करण्यात आली आहे. त्याला मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दि. १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर एसपी अशोक नखाते, डी वाय एस पी राजकुमार शिंदे, निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, उपनिरीक्षक राजेंद्र खनके,(केसीएन) छोटू वैद्य, देवसिंग तायडे, विशाल सपकाळे, निखिल नारखेडे यांनी केली आहे. तपास उपनिरीक्षक बोरकर करीत आहेत.