यावल शहरात धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक
यावल (प्रतिनिधी) : जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था कायम राहणे कामी यावल पोलीस स्टेशन हद्दीतील करणाऱ्या गुन्हेगारांचा बीमोड करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिली. ते गुरुवार दि.१८ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता यावल पोलीस स्टेशन आवारात शांतता कमिटी सदस्यांची बैठक झाली, त्या बैठकीत बोलत होते.
पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सांगितले की, यावल शहराची कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा अबाधित राहणे कामी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. शहरातील गुन्हेगारीचा कचरा साफ करणार असून त्यासाठी चांगल्या प्रकारचा मोठा कायद्याचा खराटा हाती घेतला आहे. (केसीएन)कारवाई करताना कोणाचीही हायगय केली जाणार नाही असेही ते म्हणाले.
रविवार दि.२१ जुलै रोजी यावल शहरात सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त श्री महर्षी व्यास व श्रीराम मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच दिवशी मुस्लिम बांधवांचा पेहरन- ए शरीफ कार्यक्रमाची भव्य अशी मिरवणूक सालाबाद प्रमाणे दुपारी २ वाजता निघणार आहे. मिरवणूक सालाबाद प्रमाणे निश्चित अशा मार्गाने यावल शहरातून काढण्यात येणार आहे. पेहरन ए शरीफ कार्यक्रम आयोजकांनी कायदा सुव्यवस्था, जातीय सलोखा कायम राहावा म्हणून यावर्षी मिरवणूक वाजंत्री न लावता काढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाचे शासनातर्फे व यावल शहरातील नागरिकांनी कौतुक करून अभिनंदन केले.
शांतता कमिटीत ज्येष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीर खान, हाजी इक्बाल, करीम मेंबर, भगतसिंग पाटील, गोपालसिंग पाटील, प्रा. मुकेश येवले, डॉ. निलेश गडे, उमरअली कच्ची, विजय सराफ, पराग सराफ, मो. हबीब मो. याकूब, सय्यद युनूस, शेख हबीब, रहेमान खाटीक, कयूम पटेल, नितीन सागर, विवेक सोनार, अमोल भिरुड इत्यादी शांतता समिती सदस्य उपस्थित होते.