शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पथकाला यश
जळगाव (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील बोर अजंटी येथील येथील ४० वर्षीय महिलेला गर्भपिशवीला ५० गाठी असल्याचे निदान झाल्यानंतर तिला शस्त्रक्रिया झाल्यामुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जीवदान मिळाले आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले आहे.
चोपडा तालुक्यातील बोर अजंटी येथील येथील ४० वर्षीय महिला पोटदुखी व अशक्तपणाने ग्रस्त होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या डॉक्टरांनी त्यांना तपासले असता रक्ताचे प्रमाण १० ऐवजी केवळ ५ होते. तसेच त्यांच्या पोटामध्ये ९ महिन्याच्या गर्भाईतका गर्भपिशवीचा गोळा असल्याचे निदान करण्यात आले. नंतर त्यांना ५ रक्ताच्या पिशव्या लावण्यात आल्या. त्यांच्यावर विभागातील सहायक प्रा. डॉ. मिताली गोलेच्छा यांनी दुर्बिणीद्वारे हि किचकट शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांच्या पोटातून तब्बल ५० गाठी काढण्यात आल्या.
शस्त्रक्रियेसाठी डॉ. मिताली यांना डॉ बसवराज होंना, डॉ पूजा वाघमारे, डॉ अमृता दुधेकर, डॉ माधुरी उदगिरे, भूलशास्त्र विभागाच्या डॉ अमित हिवरकर, डॉ. चेतन आतरट, शस्त्रक्रियागृहाच्या इन्चार्ज परिचारिका तुळसा माळी यांनी सहकार्य केले. अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत सुट्टीचे कार्ड व लोह-कॅल्शियमच्या गोळ्या देऊन रुग्णाची रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली.
“”सदरील गोळा हा खूप मोठा होता .पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया केली असती तर यासाठी २५-३० टाके आले असते. परंतु दुर्बिणीद्वारे बिन टाक्यांची शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णाला काहीही त्रास न होता लवकर सुट्टी देखील करण्यात आली. तसेच ही गाठ कॅन्सरची नसल्याने नातेवाईकांना दिलासा मिळाला.””
– डॉ मिताली गोलेच्छा, लॅपरोस्कॉपिक सर्जन,जीएमसी, जळगाव.
“”स्त्री रोग विभागात अनेक गुंतागुंतीच्या व किचकट शस्त्रक्रिया देखील दुर्बिणीद्वारे नियमित केल्या जातात.तसेच या शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत केल्या जातात.सर्व गरजू रुग्णांनी या अत्याधुनिक शस्त्रक्रियांचा लाभ घ्यावा.””
– डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता