गोंदिया (वृत्तसंस्था) – गोंदिया शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे. त्या महिला सफाई कामगार आहेत. शहरातील नागरिकांना घरातील कचरा रस्त्यावर म्हणा किंवा कुठेही फेकला तरी पसरलेली घाण स्वच्छ करण्याची जबाबदारी या महिला सफाई कामगारांवर आहे. त्यामुळे समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मात्र, गोंदिया जेसीआय राईस सिटी गोंदिया या सामाजिक संघटनेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 122 सफाई कामगार महिलांचा सत्कार केल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरवळत होते. भारत महासत्तेकडे वाटचाल करत असताना जी महत्त्वाची आव्हाने भारतापुढे आहेत. त्यात स्वच्छता हे सर्वात मोठे आव्हान आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण मोठमोठे उद्योग उभारले, धरणे बांधली, रेल्वे, रस्ते, विमानसेवा अशा अनेक बाबींत आपण खूप प्रगती करीत राहिलो आहोत. पण स्वच्छता हा आतापर्यंत आपल्या देशात सर्वाधिक दुर्लक्षित विषय राहिला आहे. हेच काम नगर परिषदेच्या माध्यमातून या 122 महिला शहर स्वच्छतेची काम करतात. मात्र, त्यांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षाच येते. त्यांची स्वच्छतेची दखल कुठेही घेतल्या जात नाही.यामुळेच महिला दिनाच्या निमित्ताने या सर्वांचे कौतुक करत असताना महिला दिन हा केवळ औपचारिक दिन राहू नये. यासाठी आज स्वच्छता अभियानातील सिंहाचा वाटा उचलणाऱ्या स्त्रियांचं कौतुक करण्यासाठी जेसीआई गोंदिया राईस सिटी सफाई करणाऱ्या या 122 महिलांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून एक नवा पायंदा घातला. त्यामुळे या सर्व महिला भारावून गेल्या. अन् त्यांच्या डोळ्यातील अश्रू अक्षरशा अनावर झाले.