महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात
नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी तीन लाचखोरांना पकडले आहे. यात महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून आणि गटविकास अधिकाऱ्याचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या धडक कारवाईमुळे नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
येवला शहरातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांना २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांचे ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनांतर्गत २०२२-२३ करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तीवर ठेकेदारामार्फत झालेले विकासकामाचे बिल मंजूर करायचे होते. त्या चेकवर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाच्या दोन टक्के या प्रमाणे २० हजार रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी करून स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
त्यांच्याविरुद्ध येवला शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक शर्मिला घारगे वालावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी, याच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी निलिमा केशव डोळस पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. गांगुर्डे, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण आदीच्या पथकाने कारवाई करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत, भूसंपादनाचा ना हरकत दाखला देण्यासाठी ७०० रुपयांची लाच स्वीकारताना येवला येथील अव्वल कारकून जनार्दन भानुदास रहाटळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांचे चुलत चुलते यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला येथे भूसंपादनाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. दाखला देण्याच्या मोबदल्यात जनार्दन रहाटळ यांनी दि. ३ जुलै रोजी ११०० रुपयांची मागणी केली.
त्यात १०० रुपये स्वीकारून उर्वरित हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्याशी संपर्क साधला. पडताळणी कारवाई दरम्यान रहाटळ यांनी तडजोडीअंती ७०० रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले. लाचेची रक्कम उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला येथे स्वीकारल्याने त्यांच्याविरुद्ध येवला पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसऱ्या घटनेत, १ लाख रुपयांची लाच घेताना महावितरण विभागाचा उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडले. किसन भीमराव कोपनर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, पिंपळगाव बसवंत येथे ते कार्यरत होते. दुकानाचे व्यावसायिक मीटर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न राबवत त्या ठिकाणी इंडस्ट्रीज इलेक्ट्रिक मीटर बसवून देण्यासाठी १ लाख रुपये मागितले होते.
लाचलुचपत विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पिंपळगाव बसवंत येथील पोलीस ठाण्यात या प्रकरणी लाचखोर उपकार्यकारी अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.