चंद्रपुरातील वरोरा पोलीस स्टेशनमध्ये कोठडीतील घटना सीसीटीव्हीत कैद
चंद्रपूर / जळगाव (वृत्तसेवा) : समाजसेवक बाबा आमटे स्थापित गजबजलेल्या वरोरा आनंदवनातील वसाहतीत दिव्यांग आई- वडिलांसोबत राहणाऱ्या एका युवतीची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या केल्याची खळबळजनक घटना दि. २६ जूनच्या रात्री ९ वाजता घडली होती. याप्रकरणी चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित जळगाव जिल्ह्यातील तरुणाला २४ तासात अटक केली होती. तो पोलीस कोठडीत असताना त्याने रविवारी दि. ३० जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बुटाच्या लेसने कोठडीतल्या शौचालयात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
आरती दिगंबर चंद्रवंशी (वय २४) या तरुणीचा दि. २६ जूनला सकाळी घरी एकटीच असताना संशयित आरोपी समाधान लुका माळी (वय २२, रा. आनंदवन, वरोरा, मूळ रा. चोपडा जि. जळगाव) याने धारदार शस्त्राने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.(केसीएन)दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरतीचे वडील दिगंबर हे सेवाग्राम येथील काम आटोपून रात्री ९ वाजता आले तेव्हा घटना उघड झाली होती.
या प्रकरणात पोलिसांनी दि. २७ जूनला सकाळच्या सुमारास समाधान माळी (रा. चोपडा, जि. जळगाव, हल्ली मु. वरोरा) याला अटक केली होती. त्याने तपासात, प्रेमप्रकरणातून हत्या केल्याचे सांगितले होते. दरम्यान त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने तो वरोरा येथील पोलीस स्टेशनमध्ये कोठडीत होता.(केसीएन)दरम्यान, रविवारी दि. ३० जून रोजी त्याने सकाळी कोठडीबाहेर असणारे त्याचे बूट ओढून घेऊन त्याच्या लेस काढून घेतल्या. कोठडीच्या शौचालयात जाऊन लेसचा गळफास करून त्याने आत्महत्या करून घेतली.
काही वेळाने पोलिसांना समजताच त्यांनी सरकारी रुग्णालयात त्याला दाखल केले असता तेथे मयत घोषित करण्यात आले आहे. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.(केसीएन)दरम्यान, या घटनेचा तपास आता सीआयडीकडे दिला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. चंद्रपुरात पोलीस कोठडीत खून प्रकरणातील संशयीत आरोपीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.