काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल
मुंबई (वृत्तसेवा) : ॲड. उज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून ॲड. उज्वल निकम यांनी निवडणूक लढवली. मात्र पराभूत झाल्यांनतर त्यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल टीकेची झोड उठत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जोरदार आक्षेप घेतला आहे. आता सरकारी वकीलही भाजपचेच राहणार काय असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून भाजपतर्फे उमेदवारी करणाऱ्या ॲड. उज्ज्वल निकम यांचा महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांनी पराभव केला. वास्तविक राजकीय पक्षाचा शिक्का लागला असताना आणि भाजप नेते म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांना संबोधले जात असताना त्यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या नियुक्तीबाबत आश्चर्य आणि टीकाही व्यक्त होते आहे.
ॲड. उज्ज्वल निकम यांचा पराभव होऊन पंधरा दिवसही झाले नाही तोच त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नियुक्ती आश्चर्यकारक समजली जाते आहे. यावर विरोधकांनी आक्षेप घेत सरकारने या नियुक्तीचा फेरविचार करावा अशी मागणी करीत आहे.