एरंडोल तालुक्यातील कढोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील कढोली येथील शेतमजूर कुटुंबातील १७ वर्षीय मुलाने राहत्या घरात विषारी औषध घेतल्याची घटना दिनांक १४ मे रोजी दुपारी २ वाजता घडली होती. त्याच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असतांना सोमवारी १७ जून रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पवन जगदीश डावर (वय १७ रा. कढोली ता. एरंडोल) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. पवन डावर हा परिवारासह कढोली गावात वास्तव्याला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. शुक्रवार दिनांक १४ मे रोजी दुपारी २ वाजता त्याने विषारी औषध प्राशन केले होते. त्यामुळे त्याला नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
त्याच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी दिनांक १७ जून रोजी रात्री १० वाजता मृत्यू झाला. विषारी औषध घेण्याचे कारण समोर आलेले नाही. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हंबरडा फोडला होता. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.