न्यूयॉर्क : ;- अमेरिकेतील आगामी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडन यांचे नाव आघाडीवर आहे. जो बायडन अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा इच्छुक आहेत. अध्यक्ष पदाची निवडणूक चार महिन्यांवर आलेली असताना जो बायडन यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील एका न्यायालयाने जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांना दोषी ठरवलं आहे. अवैधपणे शस्त्र खरेदी करणे आणि अंमली औषधांचा वापर करण्यासंदर्भात खोटं बोलल्या प्रकरणी हंटर बायडन दोषी आढळले आहेत. या प्रकरणात हंटर बायडन यांना 25 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही अध्यक्षाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची पहिली वेळ आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात कोर्टानं निर्णय जाहीर केला आहे. 54 वर्षांच्या हंटर बायडननं 2018 मध्ये 38-कॅलिबर कोल्ट कोबरा रिवॉल्वर खरेदी केली होती. ही रिवॉल्वर खरेदी करताना त्यांनी अंमली पदार्थांच्या उपयोगाबाबत खोटी माहिती दिली होती. त्यामध्ये ते दोषी आढळले आहेत. हंटर बायडन यांनी त्यावेळी आरोपांचा इनकार केला होता.
हंटर बायडन यांना दारु आणि क्रॅक कोकेनचं व्यसन होतं. आता हंटर बायडन यांना दोषी ठरवल्यानं जो बायडन यांच्या निवडणूक मोहिमेवर परिणाम होणार का हे पाहावं लागेल.