रावेर (प्रतिनिधी) : सावदा शहरात नगरपालिका मालकीचा व एका संस्थेने भाडेतत्त्वावर घेतलेला एक गाळा परस्पर बनावट सही शिक्के व प्रतिज्ञापत्र करून स्वतः चे नावे करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक निबंधक अशोक बागल यांच्या फिर्यादीवरून चार संशयीतांविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अशोक डी. बागल (वय ५८, रा. मुक्ताईनगर, जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार, २०१६ पासून २०१९ पर्यंत मुक्ताईनगर येथे ते कार्यरत होते. रावेर तालुक्यातील सहकारी पतसंस्था व इतर संस्थेचा कार्यभार होता. त्यापैकी महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था, यावल संस्थेवर मुख्य अवसायक म्हणून कार्यरत होते.
सावदा शाखेकरीता सावदा येथील नगरपालिकेच्या मालकिच्या छत्रपती संभाजी महाराज शॉपींग कॉम्प्लेक्समधील गाळा क्रमांक एक हा ३ लाख ८५ हजार रुपये अनामत रक्कम देवून भाडे तत्वावर घेण्यात आला आहे. मात्र हा गाळा संशयीत विक्की कुमार आहुजा, अंबादास फुलचंद पुर्भी, युवराज, रुपचंद भोई, विजय अरुण सोनवणे (सर्व रा.सावदा) यांनी कटकारस्थान रचून बागल यांची बनावट सही व बनावट शिक्के तयार करून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा गाळा विक्कीकुमार आहुजा यांच्यावर नावावर लावण्यासाठी नगरपरिषदेकडे जमा केला.
संबंधित आरोपीशी व्यवहार झाला नसताना व फिर्यादी रावेर तहसीलमध्ये उपस्थित असल्याचे दर्शवून ७ मे २०१८ रोजी खोटे व बनावट प्रतिज्ञापत्र तयार केलेले आहे. चारही आरोपींनी पूर्वतयारी करीत माझे नाव व सही शिक्यांचा बनावट वापर करीत आपली फसवणूक केली आहे. संबंधीत कागदपत्र नगरपालिका सावदा व तहसील कार्यालय, रावेर यांच्याकडून मिळण्यास उशीर झाल्यानंतर बुधवार दिनांक ५ जून रोजी संशयीत विक्की कुमार आहुजा, अंबादास फुलचंद पूर्वी, युवराज रुपचंद भोई, विजय अरुण सोनवणे (रा. सावदा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत.