पाचोरा तालुक्यात बिल्दी फाट्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा तालुक्यातील बिल्दी फाट्यावर मंगळवारी दि. २८ मे रोजी संध्याकाळी दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात एक प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर २ बालक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
गुलाब परशुराम सूर्यवंशी (वय ६५, रा. नांद्रा ता. पाचोरा) असे मयत प्रौढाचे नाव आहे. ते नांद्रा गावात आई, पत्नी, १ मुलगा, २ विवाहित मुली यांच्यासह राहत होते. शेतीकाम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा मुलगा विकास हा नंदुरबार येथे एका संस्थेत कामाला आहे. ते त्यांच्या नातवंडांसह जात असताना जळगावकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने समोरून त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले होते. तर २ बालक हे किरकोळ जखमी होते. दोघं गंभीर जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचाराकरिता रवाना करण्यात आले होते.
दरम्यान, जळगावात उपचार सुरु असताना सकाळी गुलाब सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते. दुसऱ्या दुचाकीस्वाराची माहीती मिळू शकली नाही.