शिरसोली ग्रामपंचायतीने रविवारी नेमके केले तरी काय ?
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील ग्रामपंचायतीत नायगाव धरणावर पंधराव्या वित्त आयोगातून ९ लाखांच्या रकमेत सोलर पंप उभारण्यात आल्याची नोंद आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक पुनमचंद भादू माळी यांनी शनिवारी दि. २५ रोजी सकाळी नायगाव धरणावर जाऊन पाहणी केली असता तेथे प्रत्यक्षात कुठल्याच प्रकारचे सोलर पंप लावण्यात आलेले नाही, असे चित्र दिसून आले होते. याबाबत “केसरीराज” सातत्याने वृत्त प्रसिद्ध करीत असल्याने आता रविवारी दि. २६ मे रोजी शिरसोली ग्रामपंचायतीच्या वतीने नायगाव धरणावर सोलरपंप उभारण्याकरिता खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाख ६९ हजार रुपये भ्रष्टाचार झाला असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना शुक्रवारी भेट घेऊन माहिती दिली आहे. तसेच, दोषी सदस्यांवर व ग्रामसेवकांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक पुनमचंद भादू माळी यांनी शनिवारी दि. २५ रोजी सकाळी नायगाव धरणावर जाऊन पाहणी केली होती. तेथे पाहणी केली असता तेथे सोलर व त्यावरील पंप दिसून आलेले नव्हते.
पंधराव्या वित्त आयोगातून नायगांव धरणावरील सोलर ७ लाखाचे व त्यातील पंप २ लाखाचा असे एकूण ९ लाख रुपये भ्रष्टाचार झाला आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक पुनमचंद भादू माळी यांनी दिली आहे. याबाबत सातत्याने “केसरीराज” ने वृत्त प्रसिद्ध करून शिरसोली प्रशासनासह जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. आता रविवारी दि. २६ रोजी सकाळी नायगाव धरणावर सोलरपंप उभारण्याकरिता खड्डे खोदण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिरसोली ग्रामपंचायत नेमके करते तरी काय हे समजून येत नाही. याबाबत खड्डे खोदणाऱ्या मजुरांना ग्रामस्थांनी विचारले असता, त्यांनी सोलरपंप उभारण्यासाठी कंत्राटदारांनी खड्डे खोदण्याबाबत सांगितल्याचे त्यांनी सांगितले.