अटकेतील संशयित मारेकऱ्यांची संख्या ७
जळगाव (प्रतिनिधी) : जून्या वादातून किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा टोळक्याने खून करुन हल्लेखोर पसार झाले होते. यातील फरार संशयित प्रशांत उर्फ आकाश युवराज सपकाळे (रा. मोहन टॉकीजवळ, असोदा रोड) हा भुसावळ तालुक्यातील पाडळसे येथे असल्याची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांच्या पथकाने शनिवारी सकाळी मुसक्या आवळल्या. त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहरातील प्रबोधन नगरातील किशोर सोनवणे या तरुणाचा पैशांच्या देवाण-घेवाणसह जून्या वादातून टोळक्याने हल्ला केला. यामध्ये त्याला लाकडी दांडक्यांसह धारदार शस्त्राने वार करुन किशोर याचा खून केल्याची घटना दि. २२ रोजी कालंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानू येथे घडली होती. याप्रकरणी ११ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शनिपेठ पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांचे पथकाकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
आतापर्यंत या गुन्ह्यातील मुख्य संशयित रुपेश सोनार, मयूर कोळी, ईश्वर काकडे, रुपेश काकडे, प्रशांत काकडे, दुर्लभ कोळी या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या, तर इतर संशयित मात्र अद्याप फरार आहेत. खून केल्यानंतर पसार झालेल्या प्रशांत उर्फ आकाश युवराज सपकाळे हा भुसावळ तालुक्यातील पाडळसे येथे आल्याची माहिती शनिपेठच्या गुन्हे शोध पथकातील सपोनि विठ्ठल पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोना किरण वानखेडे, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, गजानन वाघ यांचे पथक तयार करीत पाडळसे येथून संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून अन्य संशयितांचा शोध घेतला जात आहे.