उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणून दिली थरार घटनेची कबुली
जामनेर तालुक्यातील पळासखेडा बु. येथील घटना
जामनेर प्रतिनिधी) : तालुक्यातील पळासखेडा येथे दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून पिता-पुत्रांमध्ये जोराचा वाद् झाला. यामध्ये राग अनावर झाल्याने पुत्राने पित्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घूण हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दि. १६ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकिस आली आहे.
बाजीराव राजाराम पवार (वय ५५, रा. पळासखेडा बु., ता. जामनेर) असे मयत पित्याचे नाव आहे. हे गावात पत्नी, दोन मुले, विवाहित मुलगी, नातवंडे यांच्यासह राहत होते. गाडी ड्रायव्हर करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवार दि.१६ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरामध्ये बाजीराव पवार आणि त्यांचा मुलगा सुमित बाजीराव पवार (वय ३२) यांचा दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाला.
वाद विकोपाला जाऊन मुलाने धारदार शस्त्राने पित्यावर सपासप वार केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ग्रामस्थांच्या मदतीने आणण्यात आला. तेव्हा मारेकरी मुलगा देखील सोबत होता. घटना ऐकून त्यावेळी डॉक्टरांसह कर्मचारी देखील चक्रावून गेले. त्यानंतर जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली.
पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयात येऊन संशयित आरोपी सुमित पवार याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान या थरारक घटनेमुळे पळासखेडा बु. गावामध्ये खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.