भडगावला येत असताना नाशिक जिल्ह्यात घडली घटना
नाशिक (प्रतिनिधी) : नांदगावनजिक छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर समोरून येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आईसह भाऊ-बहिण या अपघातात मृत्यूमुखी पडले या अपघातात तीन वर्षीय मुलगा मात्र बचावला अजून त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्याच्या शहरात राहणाऱ्या विश्वनाथ फकिरा पाटील या भावाच्या घराच्या वास्तुशांतीसाठी नाशिक येथील रहिवासी असलेले वंदना संतोष ललवाडे (वय ४०), शुभम संतोष ललवाडे (वय २०), निकिता मनोज शिंदे (वय २२) आणि तीन वर्षीय बालक नाशिकहून भडगाव येथे कार (क्र. एमएच/ १५ /सीडी/२०५७) ने सकाळी निघाले होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास नांदगाव-संभाजीनगर रस्त्यावर गंगाधरी गावाजवळील हॉटेल तेजस नजिक समोरील एका वाहनाला ओव्हरटेक करणारी चाळीसगाव -मनमाड बस (एमएच./१४/बी.टी/ ४४९८) ललवाडे यांच्या कारवर आदळली. या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले. त्यास मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचीही प्रकृती गंभीर आहे.
हा अपघात इतका भीषण होता की अपघातात कारचा चक्काचुर झाला. अपघातात वंदना यांचा मुलगा संतोष आणि मोठी मुलगी निकिता यांचा मृत्यू झाला. एकाच कुटूंबातील तिघांवर काळाने झडप घातल्याने या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.