पुणे (वृत्तसंस्था) – राजगुरुनगर -खेड तालुक्यातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या सुमारे तीनशे कामगार व मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी खेड पंचायत समितीच्या माध्यमातून मोफत एसटी बस उपलब्ध करून दिल्या असून त्या माध्यमातून पाठविल्याची माहिती सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
दरम्यान, यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तहसीलदार सुचित्रा आमले यांचे सहकार्य लाभले.
एसटी बस उपलब्ध करावी, यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यात आला. नीलकमल हॉटेलच्या मालकांनी व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. कम्युनिटी किचन व सेवाभावी व्यक्ती संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून कामगारांना जेवण उपलब्ध देण्यात आले होते.
परभणी, अमरावती येथे जाणाऱ्या कुटुंबाला व कामगारांना खासगी बस, जीप उपलब्ध करून पाठविण्यात आले. विस्तार अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक यांनी परिश्रम घेतले. 10 बसेसच्या माध्यमातून कामगारांना पाठविण्यात आले.