जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद जवळ उड्डाणपूल परिसरात भुसावळहुन जळगाव येथे येणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण कामगार ठार झाला आहे. रुग्णालयात त्यांच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
मडीया उर्फ मन्साराम भावसिंग बारेला (वय २४, रा. मलगाव जि. खरगोन, मध्यप्रदेश, हमु भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो भुसावळ येथे आई, वडील, पत्नी, २ मुले यांच्यासह राहत होता. बांधकामांवर काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. मडीयाची पत्नी ६ महिन्यांची गर्भवती आहे. काही दिवसांनी घरात बाळ येणार म्हणून त्याच्या घरात आनंदाचे वातावरण होते. शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी मडीया हा दुचाकीने एकटाच भुसावळ येथून जळगाव येथे काही कामानिमित्त निघाला होता. दुपारी १२ वाजेच्या सुमारास नशिराबाद उड्डाणपुलाजवळ त्याचा भीषण अपघात झाला.
या अपघातात तो गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषित केले. यानंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम उशिरा सुरु होते.