‘बीआरएस’चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, अस्मिता पाटील, सरिता नेरकर यांच्यासह पाचोरा, भडगावच्या नगरसेवकांनी बांधले शिवबंधन
जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मुंबईत ‘मातोश्री’वर शेकडोंच्या संख्येने गर्दी
मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने भारतीय जनता पक्षासह शिवसेना शिंदे गटाला धक्का देणे सुरूच ठेवले आहे. आज शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उपस्थितीमध्ये बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील नेत्या प्रा. डॉ.अस्मिता पाटील, जळगावच्या भाजपा नगरसेविका सरिता नेरकर यांच्यासह पाचोरा आणि भडगाव येथील नगरसेवकांनी शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री येथे जळगाव जिल्ह्यातील सुमारे ४०० ते ५०० कार्यकर्त्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती. सुरुवातीला भारत राष्ट्र समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा टेलर यांना पक्षाचा गमछा देऊन उद्धव ठाकरे यांनी प्रवेश दिला. त्यानंतर पाचोरा येथील शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व तसेच भाजपा आणि आता शिंदे गटात असलेले प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. यानंतर जळगावच्या भाजपाच्या प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेविका सरिता अनंत नेरकर यांनी प्रवेश केला.
यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विशाल पालवे, शुभम लाड, वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील मोरसिंग राठोड, पाचोरा येथील संदीप सिसोदिया,अनिकेत पाटील,रसूल पिंजारी, भडगाव येथील शब्बीर खान, अब्दुल रहमान, शेख सलीम, राजू शेख, बशीर शेख, मोहसीन शेख, मोहन परदेशी, शफिक टेलर, सुवर्णा पाटील, गायत्री पाटील, लासुर येथील अजय रंगराव देवरे, पंकज देवरे, पाचोरा येथील शेख रसूल, फिरोज पिंजारी, पिंपळगाव हरेश्वर येथील देविदास महाजन आदींनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, पाचोरा -भडगाव मतदारसंघातील शिवसेना नेत्या सौ.वैशालीताई सुर्यवंशी,सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शहर प्रमुख शरद तायडे, धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, युवा सेना सचिव विराज कावडिया, तालुकाप्रमुख उमेश साहेबराव पाटील , आदी नेत्यांची उपस्थिती होती. दरम्यान हे शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू असल्यामुळे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार करण बाळासाहेब पवार यांना याचा लाभ मिळून त्यांना विजय मिळण्याची शक्यता बळावली आहे. आज प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी करण पवार यांच्या प्रचाराला झोकून देऊन काम करणार अशी ग्वाही यावेळी पक्षप्रमुखांना दिली आहे.