नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. अशीच स्थिती साईबाबा हयातीत असतानाही आली होती. त्यावेळी सर्वधर्म समभाव व श्रद्धा सबुरीचा अनमोल मंत्र देणाऱ्या साईबाबांनी सुद्धा त्यावेळी आलेल्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गावात लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. याचा उल्लेख श्री साईसच्चरित ग्रंथाच्या अध्याय क्रमांक 23 मध्ये आढळतो.
शिर्डी गावात साईंच्या हयातीत महामारीची साथ आली होती. त्यामुळे गावकरी घाबरून गेले होते. गावात दवंडी देऊन या महामारीविषयी माहिती सांगितली जात होती. त्यावेळी महामारीमुळे गावकऱ्यांनी दुसऱ्या गावातील व्यक्तींना गावात प्रवेश बंदी केली, तर गावातील सर्व व्यवहारही बंद केले होते. खुद्द साईबाबांनीच जोपर्यंत मरीची साथ सुरू आहे, तोपर्यंत कोणीही गावात बकरा मारू नये व गावच्या हद्दीत बाहेर गावाची गाडी येऊ देऊ नये, असे सांगितले होते. या नियमांचे सर्वजण काटेकोर पालन करू लागले.विशेष बाब म्हणजे बाबांचा अंधश्रद्धेवर मुळीच विश्वास नव्हता.
त्यांच्या मते या खोट्या कल्पना होत्या व लोकांचा अडाणीपणा होता. एकीकडे गावकऱ्यांनी नियमांचा कडक अंमल करावा आणि दुसरीकडे बाबांनी त्यात मोडता घालावा. पण तो कशासाठी होता, हे जाणूनच सर्वजण बाबांचा आदर करत होते. महामारीच्या काळात नियमांचे थोडेही उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात असे, गावातील पंचांसह गावकरी निर्णय काटेकोरपणे पाळत असत. त्यामुळे आताही करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय किती महत्त्वाचा आहे, हे शेकडो वर्षांपूर्वी साईबाबांनी पटवून दिला आहे. शेवटी संतांना सुद्धा लॉकडाऊनचे महत्त्व त्याकाळी कळाले. मग आता करोनाच्या संकटातसुद्धा ते कामी आले, हेच यावरून सिद्ध होते.







