एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : एकाच परिसरातून वेळोवेळी १५ बकऱ्या चोरणाऱ्या पती-पत्नीला रिक्षा व मुद्देमालासह ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरफराज उर्फ सोनू सईद खान या रिक्षाचालकासह व त्याची पत्नी मर्जिना सर्फराज खान असे संशयित आरोपींचे नाव आहे. कासमवाडी परिसरातून बकऱ्या चोरी होण्याचे प्रमाण वाढून एका पाठोपाठ १५ बकऱ्या चोरीला गेल्या. या संदर्भात इंदुबाई रामा माळी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना बकऱ्यांची चोरी सरफराज खान व त्याची पत्नी मर्जिना खान यांनी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोउनि दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, सचिन पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे यांनी दोघांना रिक्षासह ताब्यात घेतले व बकरी हस्तगत केली. यात आणखी एका जणाचे नाव निष्पन्न झाले असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.