जळगावातील धक्कादायक घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातील नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी दि. ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली. विद्यार्थिनीच्या पालकांना धक्का बसला असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
करुणा संतोष बोदडे (वय २१) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती वडोदा ता. यावल येथील रहिवासी होती. तिच्या पश्चात आई, वडील, १ भाऊ, बहीण असा परिवार आहे. मोलमजुरी करून तिचा परिवार उदरनिर्वाह करीत आहे. करुणा हि सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारातील असलेल्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातील नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होती. त्यासाठी महाविद्यालयाच्या समोरील दीक्षितवाडीतील वानखेडे हॉस्टेलमधील खोलीत राहत होती. तिच्यासह अन्य तिच्या ३ मैत्रिणी देखील राहत होत्या. यापैकी २ मैत्रिणी ह्या गावाला गेलेल्या होत्या.
रविवारी दुपारी करुणाची दुसरी सहकारी हि गावात गेली होती. त्यावेळी ती खोलीत एकटीच होती. दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान कधीतरी करुणाने दोन ओढणीच्या साहायाने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केली. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास दुसरी सहकारी जेव्हा परतली, तेव्हा करुणा दरवाजा उघडत नाही म्हणून तिने घरमालकीण आजीला माहिती दिली. त्यांनी खोलीतील मागील बाजूस असलेलले दार पाहिले तर ते थोडे उघडे होते. त्यातून आत डोकावले असता करुणा हि दोघांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली.
दरम्यान, जिल्हापेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पीएसआय अरुण मोरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सविस्तर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. तेथे तपासणी करून सीएमओ डॉ. निखिल तायडे यांनी तिला मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयात एकच हंबरडा फोडला. दरम्यान, दीड महिन्यांपूर्वीच तिचा वाढदिवस खोलीवर तिच्या मातापित्यासह साजरा झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, करुणाच्या आत्महत्येप्रकरणीचे कारण अस्पष्ट आहे.