वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ‘भारत एक महान देश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत. भारताला सोबत घेऊन आम्ही काम करतोय. भारतात कोरोनावर लस तयार करण्याचं मोठं काम सुरु आहे. भारताकडे चांगले वैज्ञानिक आणि संशोधन आहे. भारतासोबत कोरोनाची लस विकसित करण्याचं काम सुरु आहे’, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत
कोरोनाविरोधाच्या लढाईत अमेरिका भारताला व्हेंटिलेटर देईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन सांगितलं आहे. ‘कोरोनाविरोधाच्या लढाईत अमेरिका भारतासोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे. मला सांगायला आनंद होत आहे की, अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करेल. याशिवाय भारत आणि अमेरिका एकत्र मिळून कोरोनावर लस विकसित करु. अदृश्य कोरोना विषाणूला नष्ट करु’, असं डोनाल्ड ट्रम्प ट्विट करुन म्हणाले आहेत.
‘मी काही दिवसांपूर्वीच भारताचा दौरा केला होता. भारतासोबत आम्ही चांगलं काम करत आहोत. अमेरिकेत वासव्यास असणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. यापैकी अनेक नागरिक हे लस विकसित करण्याचं काम करत आहेत. हे सर्व वैज्ञानिक फार हुशार आणि महान आहेत’, असं डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी (15 एप्रिल) म्हणाले.
‘2020 वर्ष अखेरिस लस तयार होण्याची शक्यता’
कोरोना विषाणूला संपवण्यासाठी जगभरातील हजारो शास्त्रज्ञ लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिका आणि भारत मिळून लस विकसित करण्याचं काम करत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. याशिवाय 2020 वर्षाच्या अखेरिस लस विकसित करण्याचं काम पूर्ण होईल. या वर्षाच्या अखेरिस बाजारात कोरोनाला नष्ट करणारी लस मिळेल, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली.