रावेर तालुक्यातील भामलवाडीचे ग्रामस्थ भयभीत
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील भामलवाडी येथे महादेव मंदिराजवळ बिबट्याने शनिवारी दर्शन देऊन पुन्हा भामलवाडी येथील रहिवासी मधुकर हरी पाटील यांच्या शेळीला जखमी केले आहे. दोन दिवसांपूर्वी एका गायीचा बिबट्याने फडशा पाडला. त्यामुळे या गावात, परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त लवकर करावा अशी ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
गेल्या २ दिवसापुर्वी गणेश गोपाळ कोळी यांच्या गोठ्यात गाय बांधलेली होती. परंतु रात्रीच्या वेळेस बिबट्याने हळुच गोठ्यात शिरून गायीवर हल्ला करून तिला फस्त केली होती. याबाबत येथील पोलिस पाटील प्रमोद पाटील यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या सूचनेनुसार वनरक्षक ए. एच. पिंजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनास्थळी ऐनपुर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डवरे यांनी भेट दिली.
पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. डवरे यांच्या प्राथमिक निकषानुसार बिबट्याने हल्ला केल्याचे निष्पन्न केले आहे. भामलवाडीलगतच असलेल्या बलवाडी गावच्या काही शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होते. म्हणून या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळेस शेतात जात असताना एकटे न जाता सामूहिक जावे असे आवाहन रावेरचे वनक्षेत्रपाल अजय बावणे यांनी केले आहे .