आ. मंगेश चव्हाण यांचा यशस्वी पाठपुरावा
जळगाव (प्रतिनिधी) :- चाळीसगांव येथे नूतन उपविभागीय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उदघाटन गुरुवारी दि. ७ मार्च रोजी मंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ.संजय सावकारे,आ.राजुमामा भोळे,माजी आमदार स्मिता वाघ, संजय गरूड, जिल्हा बॅक अध्यक्ष संजय पवार, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपआयुक्त श्याम लोही, मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे, प्रांतधिकारी प्रमोद हिले, अप्पर पेलिस अधीक्षक कविता नेरकर आदीसह आजी माजी जिल्हा परिषद,पंचायत समिती नगरपालिका सदस्य व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
उपविभागीय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती झाल्याने नागरिकांनी देखील आता वाहतूकी संदर्भातील नियमावली पाळणे गरजेचे असल्याचे सांगून वाहतुकीचे नियम मोडणार्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी हेाईल. यासाठी नागरिकांनी देखील परिवहन विभागाच्या कर्मचार्यांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले. हेमंत जोशी पटागंणावर उभारण्यात आलेले हे कार्यालय तात्पुरते असून नवीन कार्यालयासाठी ४० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. लवकरचं नवीन कार्यालय बांधण्यात येणार असल्याचीही माहिती गिरीश महाजन यांनी दिली. यावेळी त्यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करतांना आपल्या मतदारसंघातील विकासकामासाठी संबंधित मंत्र्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निधी मिळवून घेतात.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती देतांना सांगितले की, शासनाच्या विविध योजनेतून चाळीसगांव मतदारसंघात निधी येत असून आगामी काळात चाळीसगांव तालुका व शहरात दर्जेदार रस्ते तयार करण्यात येणार आहे.नगरविकास विभागाकडून शहरातील रस्त्यांसाठी करोडो रूपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यांच्या कार्य आरंभ आदेश देखील निघाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालय तसेच तालुका क्रिडा संकुलातील बहुउद्देशीय हॉल व इतर विकास कामांचे ऑनलाईन उद्धघाटन करण्यात आले.चाळीसगांव उपप्रादेशिक उपविभागीय कार्यालयातून एम.एच ५२ या क्रमांकाची सिरीज सुरू करण्यात आली असून नोंदणी करून नवीन क्रमांक घेणार्या वाहनमालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.