घरून पळून जात असताना एलसीबीने घेतले ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) :- भडगाव शहरात पारोळा चौकात एका तरुणावर ब्लेडने गळ्यावर वार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव शहरातील पारोळा चौकात फिर्यादी व कोठली गावचे ग्रामपंचायतचे शिपाई रविंद्र शांताराम पाटील (वय ५५) यांचा मुलगा एकनाथ पाटील (वय २३) हा दि. ५ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याचा मित्र विशाल यांचेसह दुचाकीने वेल्डिंग दुकानाकडे जात असताना संशयीत आरोपी रविंद्र संतोष पाटील (जाधव, रा. पेठभाग, भडगाव) हा पुढे उभा होता. त्याला एकनाथ याने बाजूला हो असे सांगितले. संशयित रविंद्र संतोष याने एकनाथ याच्या दुचाकीची चावी काढून घेतली. विशाल याने चावी मागितली असता रविंद्र संतोष पाटील याने विशाल यास कॉलर पकडून मारहाण केली. तेव्हा मित्राला होणारी मारहाण थांबवत असताना एकनाथ पाटील हा विशालला सोडवू लागला. त्याचा राग आल्याने संशयित रविंद्र संतोष याने एकनाथ याच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जबर जखमी केले. त्यानंतर तो पळून गेला. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्हयातील फरार संशयिताला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील यांना संशयितांबद्दल गोपनीय माहिती मिळाली, संशयित रविंद्र संतोष पाटील हा बाहेरगावी पळून जाण्याचे तयारीत आहे. त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे तपास अधिकाऱ्यांनी भडगाव येथे जावून बाहेरगावी जाण्याच्या तयारीने घरून निघून जात असतांना पेठ भागात संशयिताला ताब्यात घेतले. त्यास पुढील योग्य त्या कारवाई करीता भडगाव पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पीएसआय गणेश वाघमारे, विजयसिंग पाटील, लक्ष्मण पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, विजय पाटील सर्व नेमणुक स्थनिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे.